आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे उद्घाटन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आले. यंदा 15 ते 17 मार्च दरम्यान रेशीम बाग, नागपूर (महाराष्ट्र) येथील स्मृती मंदिर संकुलात ही सभा आयोजित करण्यात आली आहे. संघाच्या योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या देशातील सर्व 45 प्रांतातील 1500 हून अधिक प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही वर्षातून एकदा मुख्यतः होळीच्या आसपास देशाच्या कोणत्याही भागात होते. दर तिसऱ्या वर्षी फक्त नागपुरातच आयोजन केले जाते. याशिवाय अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक दिवाळीपूर्वी आयोजित केली जाते. या बैठकांमध्ये केवळ संघटनेचे कार्य तसेच कार्यक्षेत्र यावरच चर्चा होत नाही, तर देशाच्या आणि समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवरही चर्चा केली जाते आणि आवश्यकतेनुसार ठराव मंजूर करून, त्याबाबत संघाचा दृष्टिकोन,विषय देखील स्पष्ट केला जातो.प्रतिनिधी सभेत संघटनेत काम करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांसह, संघाच्या योजनेनुसार समविचारी संघटनांचे संघटनमंत्री आणि त्या संघटनेचे अध्यक्ष व सरचिटणीस यांचाही समावेश असतो.