पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांचे भूतानला भेट देण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने आज दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात भूतानला भेट देणार आहेत.
सध्या भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे भारत दौऱ्यावर आहेत.गुरुवारी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी एकमेकांची भेट घेतली आणि अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. दोन्ही पंतप्रधानांनी परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला. यावेळी “भूतानच्या राजाच्या वतीने पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान मोदींना पुढील आठवड्यात भूतानला भेट देण्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी ते आमंत्रण स्वीकारले,” असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पंतप्रधान शेरिंग तोबगे हे अधिकृत भेटीवर भारतात आले आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिला विदेश दौरा आहे. तर एका निवेदनात म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदींनी आणि शेरिंग तोबगे यांनी द्विपक्षीय भागीदारीच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेतला, ज्यात पायाभूत सुविधांचा विकास, कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, जलविद्युत सहकार्य, देवाणघेवाण आणि विकास सहकार्य यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान तोबगे यांनी एक्स हँडलवर एका पोस्टमध्ये लिहिले की, “माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. मी भूतानला दिलेल्या दृढ पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि आम्ही भूतानमधील संबंध मजबूत करण्यासाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.”
या भेटीबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तोबगे यांना त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर भेटून “आनंद” झाला आणि त्यांनी “आमच्या अद्वितीय आणि विशेष भागीदारीच्या विविध पैलूंवर अर्थपूर्ण चर्चा केली.”
दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि भूतान यांच्यातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली, ज्यामध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा, ऊर्जा कार्यक्षमता आणि अन्न सुरक्षा उपायांचा समावेश आहे.