भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमता बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. जर काँग्रेस नसती तर भारताचे विभाजन झाले नसते. काँग्रेस नसती तर देशात भ्रष्टाचार झाला नसता, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी परिवादवादावर भाष्य केले. ते म्हणाले की, शरद पवारांनी आपली कन्या सुप्रिया सुळेंना अध्यक्ष केलं म्हणून राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यामुळे अजित पवार पक्षातून बाहेर पडले. तसेच उद्धव ठाकरे हे पक्षाची सर्व सूत्र आदित्य ठाकरेंना देण्याची तयारी करत होते. यासाठी ते विचारधारा देखील सोडायला तयार होते, त्यामुळे शिवसेना फुटली.
राजकीय नेत्यांची मुले-मुली राजकारणात येऊ नये असे माझे म्हणणे नाही, पण त्यांनी स्वत:च्या हिमतीवर यावं. हक्क म्हणून त्यांनी येऊ नये. तसेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवारवादाची ऑर्डर तोडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे फक्त कुणाचा मुलगी किंवा मुलगी असल्याने त्यांना राजकारणात स्थान मिळणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मी पुन्ही येईन हे फक्त एक वाक्य नव्हतं. मी कशासाठी येईन हे देखील मी सांगितलं होतं. पण माझं ते वाक्य लोकांनी प्रसिद्ध केलं. मी पुन्हा येईल असं मी म्हणालो होतो. त्यानुसार मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना घेऊन आलो आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.