उत्तराखंडमधील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या एका माजी आमदाराने पक्षाचा राजीनामा दिला आहे. बद्रीनाथचे माजी आमदार राजेंद्र भंडारी यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
राजेंद्र भंडारी यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. तसेच त्यांनी आज दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या उपस्थित भंडारी यांचा पक्षप्रवेश पार पडला. राजेंद्र भंडारी हे पुन्हा निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. तर चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ ही एकमेव जागा काँग्रेसकडे होती. पण, राजेंद्र भंडारी यांच्या राजीनाम्यानंतर ही जागाही रिक्त होणार आहे.
राजेंद्र भंडारी यांच्यासोबतच टिहरीचे माजी आमदार धनसिंग नेगी यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जाण्याने टिहरी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील माजी आमदार विजयपाल सजवान आणि मालचंद यांनी एका दिवसापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यांनी शनिवारी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट आणि कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी प्रदेशाध्यक्ष भट्ट म्हणाले की, उत्तरकाशी काँग्रेसमुक्त झाल्याने भाजप आता राज्यातील पाचही जागा प्रचंड बहुमताने जिंकेल.