छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मोठा धक्का बसला आहे. महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी बघेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महादेव बेटिंग या ॲप प्रकरणी भूपेश बघेल यांच्यावर आयपीसीच्या विविध कलमांतर्गत फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासभंग आणि बनावट कागदपत्रे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये भूपेश बघेल यांच्याशिवाय महादेव ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्यासह अन्य 16 जणांची नावे आहेत.
8 आणि 30 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने राज्य पोलिसांना दोन अहवाल पाठवल्यानंतर बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निधीच्या संरक्षणाच्या बदल्यात महादेव ॲपच्या बेकायदेशीर कामांना परवानगी देण्यात राज्य सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे ईडीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी ईडीने दावा केला होता की, त्यांनी एक कॅश कुरियरचे इमेल स्टेटमेंट ट्रॅक केले आहे. ज्यामध्ये भूपेश बघेल यांनी यूएई मधील महादेव बेटिंग अॅपच्या प्रमोटर्सकडून कथितरित्या 508 कोटी रूपये घेतले होते. तर या अॅपच्या मालकाला सध्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
छत्तीसगड पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. ज्यामध्ये महादेव बुक ॲपच्या प्रवर्तकांनी विविध पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि प्रभावशाली राजकीय व्यक्तींना मोठ्या प्रमाणात लाच दिल्याचे म्हटले आहे.