अखेर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. काल (17 मार्च) मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा 22-16-10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.
काल झालेल्या बैठकीमध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी.वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट 23 जागांवर ठाम होता आणि संजय राऊतांनी याबाबत वारंवार भूमिका मांडली होती. पण आता ठाकरे गटाला 22 जागा देण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. तसेच ठाकरे गट आपल्याकडे असलेल्या जागांपैकी हातकणंगले जागेवर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणार आहे.
वंचितला महाविकास आघाडीने 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. हा प्रस्ताव अजूनही कायम असून महाविकास आघाडी आता वंचितची दोन ते तीन दिवस वाट पाहणार आहे. दरम्यान, आता वंचितकडून याबाबत काय प्रतिक्रिया येणार याकडे मविआचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या जागा : रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, ठाणे, कल्याण, पालघर, मुंबई दक्षिण, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, हातकणंगले (राजू शेट्टी ), जळगाव, नाशिक आणि शिर्डी.
काँग्रेसला मिळालेल्या जागा : नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला (प्रकाश आंबेडकर सोडणार), लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबई.
शरद पवार गटातील राष्ट्रवादीला मिळालेल्या जागा : बारामती, शिरूर, माढा (राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना पाठिंबा देऊ शकतो), सातारा, वर्धा, भिवंडी, रावेर, अहमदनगर, बीड आणि दिंडोरी.