राजस्थानमधील अजमेर येथे साबरमती-आग्रा सुपरफास्ट ट्रेन आणि मालगाडी यांच्यात धडक झाली. या धडकेमुळे साबरमती आग्रा कँट सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनसह चार डबे रुळावरून घसरले. साबरमती सुपरफास्ट एक्स्प्रेसचे किमान चार डबे इंजिन रुळावरून घसरल्याने अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. मदार रेल्वे स्थानकाजवळ पहाटे 1.04 च्या सुमारास साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेस क्रमांक 12548 ही मालगाडीला धडकल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये हजारो प्रवासी उपस्थित होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी झाले आहेत.
रविवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास गाडीचे सुरक्षित डबे अजमेर जंक्शनच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्याच वेळी, खराब झालेले डबे रुळांवरून हटवण्यात आले. तर सध्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ), गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्यासह अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एडीआरएम) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनच्या लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावला, पण टक्कर टाळता आली नाही. ट्रेन क्रमांक 12548, साबरमती-आग्रा कँट, अजमेरजवळील मदार येथे होम सिग्नलजवळ रुळावरून घसरली, त्यामुळे इंजिन आणि चार जनरल डबे रुळावरून घसरले, असे उत्तर पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.