सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ सीजन 2 चा विजेता एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विष तस्करी प्रकरणी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी काल (17 मार्च) अटक केली आहे. तसेच आता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशातच आता एल्विशने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेव्ह पार्ट्यांसाठी साप आणि सापांचे विष ऑर्डर केल्याची कबुली एल्विश यादवने पोलिसांनी दिली असल्याचा दावा केला जात आहे. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोएडामध्ये सापाचे विष वापरल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना भेटल्याचीही एल्विशने कबुली दिली आहे.
8 नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणात एल्विश यादवचे नाव मुख्य आरोपी म्हणून पुढे आले होते. त्यानंतर एल्विश यादवने स्पष्टीकरण देत एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एल्विशने या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, एल्विश यादवला अटक केल्यानंतर आता त्याला नोएडातील लुक्सर जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच आता त्याला जामीन मिळवून देण्यासाठी त्याचे वकील प्रयत्न करत असून त्याला सोमवार किंवा मंगळवारी जामीन मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.