लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. तर आता निवडणुकीच्या घोषणेनंतर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीनने (AIMIM) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना म्हणाले की, इम्तियाज जलील हे औरंगाबादमधून एमआयएमआयएचे उमेदवार असतील, तर अख्तरूल इमान हे किशनगंजमधून उमेदवार असतील. तर स्वत: ओवेसी हे हैदराबादमधून निवडणूक लढवणार आहेत.
सध्या AIMIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांबाबत चर्चा करत आहेत. तसेच तेथेही लवकरच उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
दरम्यान, असदुद्दीव ओवेसी यांनी महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशात AIMIM कडून किती जागा लढवणार आहे हे अद्याप स्पष्ट केलेले नाहीये. तर याआधी इम्तियाज जलील यांनी AIMIM पक्ष महाराष्टात 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.