मागील दोन दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे हे दिल्लीला पोहचले आहेत. तसेच भाजप आणि मनसे युतीची बोलणीही अंतिम टप्प्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे या युतीबाबत शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. अशातच आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंना ऑफर दिली आहे.
राज ठाकरे यांना शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याची ऑफर दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, मी राज ठाकरे यांच्या भाषणाचा फॅन आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावं अशी माझी इच्छा आहे. त्यांनी भाजपसोबत जाण्याआधी एकदा विचार करावा.
भाजपने 2019 मध्ये छोट्या पक्षांना फाट्यावर मारले होते, हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावे. आता भाजपसोबत जे दोन पक्ष आहेत त्यांचा फायदा त्यांना दिसत नाही, त्यामुळे ते छोट्या पक्षांना भाव देत आहेत. राज ठाकरेंनी महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत यावे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रोहित पवारांनी दिलेल्या या ऑफरनंतर राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार आणि ते कोणासोबत युती करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.