देशात लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता जोमाने तयारीला लागले आहेत. केंद्रात एनडीए सरकारचे जागावाटप सुरु आहे. भाजपाने लोकसभेच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये अजूनही जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. महायुतीमध्ये जागावाटप अजूनही निश्चित झालेलं नाही. कोणाला किती जागा मिळणार हे अजूनही स्पष्ट नाही. दरम्यान, आज दिल्लीमध्ये महायुतीच्या जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल व सुनील तटकरे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात आता घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम चर्चा होणार असून, जागांवर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
काही जागांवरून महायुतीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळणार याबाबत अजूनही साशंकता आहे. नाराजी असल्याचे जागावाटप निश्चित झालेले नाही. मात्र आता लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे.