काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमत्री अजित पवार यांना आव्हान देत थेट बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर आता अजित पवारांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही थेट आव्हान दिलं आहे.
माझा लायकी काय, माझा आवाका काय हे अजित पवारांना सांगतो, असं म्हणत विजय शिवतारेंनी अजित पवारांवर टीका केली होती. यालाच प्रत्युत्तर देत सूरज चव्हाण म्हणाले की, अजितदादांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारे यांना गेल्यावेळी सांगून पाडलं होतं, पण यावेळी त्यांचं डिपॉजिट जप्त करू, असं थेट आव्हानच सूरज चव्हाण यांनी दिलं आहे.
विजय शिवतारे महायुतीच्या घटक पक्षातील आहेत. त्यामुळे कोणीही निवडणूक लढवू शकतो. तसेच मागच्यावेळी आम्ही सांगून त्यांचा पराभव केलेला, पण यावेळी सांगूनच त्यांचे डिपॉझीट जप्त करू. शिवतारेंच्या किडनीवर नाही तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता आम्हाला देखील पाहायचे आहे की, शिवतारेंचा आवाका काय आहे?, अशी टीकाही सूरज चव्हाण यांनी केली.
दरम्यान, बारामतीमधून लोकसभेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार आहेत. अशातच आता विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता अजित पवारांना ते अडचणीत जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.