देशामध्ये लोकसभा निडवणुकीची तारीख जाहीर झाली आहे. ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतदान होणार आहे. दरम्यान देशभरात एनडीएने जागावाटपाचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तसेच बिहारमध्ये देखील जेडीयू आणि एनडीए यांच्यात जागावाटप जाहीर झाले आहे. मात्र त्या जागवतापवर नाराज होत केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माझ्याबरोबर अन्याय झाला असे सांगत त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
पशुपती पारस हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे मंत्री होते. एनडीएने पुतण्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला दिलेल्या जागावाटपाच्या कराराची पुष्टी केल्यानंतर पशुपती पारस यांनी हा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, “एनडीए आघाडीची घोषणा झाली असून मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे. मात्र माझ्यावर आणि माझ्या पक्षावर अन्याय झाला आहे. यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.” पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने एनडीएला बिहारमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे आता बिहारमध्ये राजकीय फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
बिहारमध्ये भाजप १७ जागांवर, JDU १६ आणि चिराग पासवान यांचा पक्ष LJP (R) ५ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे, तर एनडीएचा भाग असलेल्या एलजेपीच्या पशुपती पारस गटाला एकही जागा मिळाली नाही. राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (RLJPA) प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी शुक्रवारी हाजीपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी असेही सांगितले की त्यांच्या पक्षाचे इतर खासदार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांवरून निवडणूक लढवतील.