सध्या ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादव चांगलाच अडचणीत सापडला आहे. रेव्ह पार्टी प्रकरणामुळे नोएडा पोलिसांनी त्याला रविवारी (17 मार्च) अटक केली आहे. एल्विश यादव रेव्ह पार्टीत सापांचं विष पुरवत होता त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच काल (19 मार्च) एल्विशने पार्टीमध्ये सापांचं विष पुरवलं असल्याची कबुली देखील दिली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता एल्विशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एल्विश यादव रेव्ह पार्टीत सापांच्या विषाचा पुरवठा का करत होता? याचा देखील आता खुलासा झाला आहे. पोलिसांनी याबाबत स्वत: उलगडा केला आहे. एल्विश रेव्ह पार्टीत सापांचं विष पुरवण्याचं काम फक्त त्याचा दबदबा निर्माण करण्यासाठी आणि चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ वाढवण्यासाठी करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आपण कायद्याला घाबरत नसून मनात येईल ते करण्यास न घाबरणारा अशी प्रतिमा एल्विशला त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण करायची होती, असा खुलासाही पोलिसांनी केला आहे.
रेव्ह पार्टीमध्ये एल्विशने सापांच्या विषाचा पुरवठा केल्याचे काही पुरवे देखील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच त्याने 6 रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे यामध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाणार आहे.