पंतजली समूहाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ॲलोपॅथिक औषधच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे रामदेवबाबा आणि पतंजली समूहाच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. या प्रकरणावर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत बाबा रामदेव यांना न्यायालयाच्या अवमानाखाली कारवाई का करू नये, अशी विचारणा केली. या दोघांनी प्रथमदर्शनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.
मागील सुनावणीत, सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना नोटीस बजावली होती आणि कंपनीच्या उत्पादनांच्या जाहिराती आणि त्यांच्या औषधी परिणामकारकतेबाबत न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे प्रथमदर्शनी उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई करण्यास सांगितले होते. कारवाई का सुरू करू नये. मधुमेह, बीपी, थायरॉईड, अस्थमा, काचबिंदू आणि संधिवात इत्यादी रोगांपासून “कायमस्वरूपी आराम, बरा आणि निर्मूलन” असे आश्वासन देणाऱ्या जाहिरातीवरून पतंजलीच्या विरोधात कोणती पावले उचलली जातात, यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते.