मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद हा सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि इदगाहा मशिदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टाने मशीद कमिटीची याचिका फेटाळून लावली आहे. मशीद कमिटीने अलाहाबाद हाय कोर्टाच्या एका निर्णयाला आव्हान देत ही याचिका दाखल केली होती. या याचिकेत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे, ज्यामध्ये वादाशी संबंधित १५ खटले हाय कोर्टाने एकत्रितपणे चालवण्यास सांगितले होते.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, ही सर्व प्रकरणे एकाच प्रकारची आहेत आणि समान पुराव्यांच्या आधारे निर्णय घ्यावा लागेल. या कारणास्तव न्यायालयाचा वेळ वाचवण्यासाठी या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी करणे योग्य ठरेल. मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी – शाही इदगाह मशीद वाद संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मशीद समितीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने बंद केली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली आहे. मशीद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय पुरातत्व विभागाने एक मोठा खुलासा केला होता. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ASI ने सांगितले, मुघलांचा बादशाह औरंगजेबाने मशिदीचा मार्ग तयार करण्यासाठी या ठिकाणावरील एक हिंदू मंदिर पाडले होते. मात्र आरटीआयला दिलेल्या उत्तरात ‘कृष्णजन्मभूमीचा’ उल्लेख नसून, त्या आवारात असलेल्या केशवदेव मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु असल्याने या माहितीचा प्रतिसाद कायदेशीर लढाईत महत्वाचा ठरू शकतो.
उत्तर प्रदेश येथील मैनपूरी येथील अजय प्रताप सिंह यांनी आरटीआय दाखल करत देशातील मंदिरांबाबत माहिती मागवली होती. यामध्ये श्रीकृष्णजन्मभूमीच्या ठिकाणाबद्दल देखील माहिती मागवण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना पुरातत्व विभागाने म्हटले आहे की, १९२० मधील राजपत्राचा आधार घेत पूर्वी मशिदीच्या ठिकाणी केशवदेव मंदिर होते. तिथे मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली.