लोकसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्ष (बसप)ला मोठा धक्का देत लालगंज (आजमगड) येथील बसप खासदार संगीता आझाद यांनी सोमवारी (18 मार्च) दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. याआधी संगीता आझाद यांनी बसपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
संगीता आझाद यांच्यासोबतच त्यांचे पती माजी आमदार आझाद अरिमर्दन आणि निर्भया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात खटला लढणाऱ्या सीमा कुशवाहा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशावेळी यूपी भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्याशिवाय भाजपचे राष्ट्रीय मीडिया सह-प्रभारी संजय मयुख उपस्थित होते.
दिल्लीतील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे यांनी तीन नवीन सदस्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. सदस्यत्व स्वीकारल्यानंतर संगीता आझाद यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे आभार मानले. तसेच 400 जागा जिंकण्याचे पंतप्रधानांचे लक्ष्य पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
संगीता आझाद यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, संगीता आझाद आज खऱ्या अर्थाने स्वतंत्र मानल्या जातील कारण त्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला जाईल आणि महिला सक्षमीकरणासाठी भाजप जोमाने काम करत असताना सीमासारख्या लोकांचा पक्ष वापर करेल, असेही त्यांनी सांगितले.