लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. तसेच भाजपाने लोकसभेच्या उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपाने महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान माढा लोकसभा मतदार संघातून भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार असलेल्या रणजित निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. तसेच भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील लोकसभा लढवण्यासाठी उत्सुक आहेत. रणजित निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. या नाराजीचा फटका भाजपाचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजनांना देखील बसल्याचे पाहायला मिळाले.
धैर्यशील मोहिते पाटील नाराज असल्याचे भाजपाचे राज्यातच संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना देखील धैर्यशील मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांची नाराजी सहन करावी लागली. मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला परवडणारी नसल्याचे सांगत तुमचा निरोप पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवतो असे सांगितल्यावर त्यांची तिथून सुटका झाल्याचे पाहायला मिळाले. वरिष्ठ पातळीवर मोहिते पाटलांबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटलांनी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.
२०२४ च्या निवडणुकीच्या पहिल्यापासूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेवर दावा केल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांनाच भाजपाने तिकीट दिल्याने मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. यानंतर माढा आणि निंबाळकर पाडा अशी मोहीम कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपा आता या मतदारसंघाबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.