“मागच्या निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झालं होतं. जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो, तो भाजपला मदत करतो, डॅमेज करतो. त्यामुळे कोणीही निवडून येत नाही. ज्यामुळे जो विरोधात आहे तो निवडून येतो. म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका,” असे आवाहन करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी कॉर्नर बैठकांचा धडाका लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील येणकी गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर नाव न घेता टीका केली आहे.
प्रणिती शिंदेच्या या टिकेनंतर वंचित बहुजन आघाडीने देखील प्रतिउत्तर दिले आहे.
“ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा. आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे ?” असे प्रतिउत्तर वंचित बहुजन आघाडीने या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिले आहे.