पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकारच्या ‘नेबरहुड फर्स्ट पॉलिसी’ अंतर्गत 21 ते 22 मार्च या कालावधीत भूतानचा राज्य दौरा करणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी भूतानचे विद्यमान राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंगे वांगचुक यांची भेट घेणार आहेत.
भूतान दौऱ्यावर गेल्यानंतर पंतप्रधान मोदी भूतानचे समकक्ष शेरिंग तोबगे यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यात एक अनोखी आणि टिकाऊ भागीदारी आहे जी परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि सद्भावनेवर आधारित आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
आमचा सामायिक अध्यात्मिक वारसा आणि लोकांमधले चांगले संबंध आमचे परस्पर संबंध मजबूत करतात, असेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या भूतान दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मुद्दे आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक बाबींवर चर्चा होणार आहे. तर भूतानचे पंतप्रधान तोबगे गुरुवारी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते, जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. यावेळी तोबगे यांनी पंतप्रधान मोदींना भूतानला भेट देण्यासाठी आमंत्रण दिले होते.