सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. अशातच आता अजित पवार गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी एक पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला आहे.
बजरंग सोनावणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहित राजीनामा सादर केला आहे. त्यांनी फक्त ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे”, असं बजरंग सोनावणे यांनी पत्रावर लिहिले आहे.
या राजीनाम्याची एक प्रत बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द केली आहे. तर आता सोनावणे यांनी पक्षाला रामराम केला असून आता ते शरद पवार गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी साडेचार वाजता सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बजरंग सोनावणे हे शरद पवारांच्या संपर्कात होते. त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे आता ते बीडमध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातंय.
बजरंग सोनावणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तर सोनावणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तक्तालीन अध्यक्षही होते.