मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मनसे भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मनसे महायुतीमध्ये सामील होण्याची चर्चा सुरु आहे. मात्र त्या आधी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्यानंतर ते एकत्रितपणे अमित शहांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले होते. दरम्यान मनसे आणि भाजपा यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता असून, मनसे महायुतीमध्ये सामील होण्याच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहेत. असे झाल्यास राज्यात महायुतीला लोकसभा आणि विधानसभेला फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे राज्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला रवाना झाले होते. दरम्यान याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारले असता त्यांनी समर्पक असे उत्तर दिले आहे.
मनसे-भाजपा यांची युती होणार का? मनसे महायुतीमध्ये सामील होणार का? असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आले. तसेच मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यास त्यांना लोकसभा विधानसभेच्या किती जागा सोडणार असे देखील काही प्रश्न बिचारले गेले. यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देताना म्हणाले, आता आता या विषयावर काहीही बोलण्यापेक्षा एक -दोन दिवस वाट पहा. लवकरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. असे उत्तर देत फडणवीसांनी या विषयावर जास्त आणि स्पष्ट बोलणे टाळले आहे.
महायुतीचे जागावाटपावर दिल्लीत बैठक
महायुतीमध्ये ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात आता घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम चर्चा होणार असून, जागांवर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. काही जागांवरून महायुतीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळणार याबाबत अजूनही साशंकता आहे. नाराजी असल्याचे जागावाटप निश्चित झालेले नाही. मात्र आता लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे बैठकीत तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे.