आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या २२ मार्चपासून सुरु होत आहे. यंदा अनेक बदल आपल्याला आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांमध्ये पाहायला मिळणार आहेत. यंदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा नाही तर हार्दिक पंड्या असणार आहे. जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हाच या संघाच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. २२ तारखेला चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. ९ व्यांदा आयपीएलचा पहिला सामना खेळण्याची समाधी चेन्नईच्या संघाला मिळणार आहे. चेन्नईने आतापर्यंत ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
पहिल्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र त्याआधी चाहत्यांचे लक्ष आयपीएलच्या उदघाटनावाच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. अनेक कलाकार आपली कला या ठिकाणी सादर करणार आहेत. आयपीएल २०२४ च्या उदघाटन सोहळ्याला सोनू निगम, एआर रेहमान, अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ हे खास कार्यक्रम सादर करणार आहेत. आयपीएल २०२४ चे उदघाटन चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. सलामीच्या सामन्याआधी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
आयपीएलचा पहिला सामना चेन्नई व बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. तसेच हा सामना रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. तर दुपारी खेळवले जाणारे सामने हे ३.३० वाजता सुरु होणार आहेत. यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक असल्यामुळे बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केले आहे. उर्वरित वेळापत्रक हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २१ सामने खेळवले जाणार आहेत.