महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या रुपाने आधुनिक भारताचा पाया रचला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित भारतीय समाजाची नवरचना करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. या देशाला स्वातंत्र्य तर मिळेल; परंतु जातिभेद, उच्चनीचता आणि अस्पृश्यतेच्या बेड्यांमध्ये समाजातील बहुसंख्य वर्ग जखडून राहिला, तर हे स्वातंत्र्य नावापुरतेच राहण्याचा धोका त्यांना दिसत होता. हे चित्र बदलण्यासाठी बाबासाहेबांनीज्या सामाजिक समतेच्या चळवळीची पायाभरणी केली, तिची सुरुवात महाडलाझालेल्या धर्मसंगरात झाली. 20 मार्च 1927 रोजी त्यांनी हजारो अनुयायांसह चवदार तळ्याचे पाणी ओंजळीत घेऊन प्यायले आणि आपल्या अस्पृश्य बांधवांचा माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा मूलभूत हक्क प्रस्थापित केला. या घटनेचे स्मरण करून सामाजिक समता व ऐक्याची चळवळ सातत्याने पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण यंदा साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ‘राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक सुधारणा’ असा पेच सतत वेगवेगळे रूप घेऊन आपल्यासमोर उभा राहिला. या प्रश्र्नालाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णायक उत्तर दिले, ते अस्पृश्यांच्या राजकीय व सामाजिक हक्कांसाठीची चळवळ उभारून. बाबासाहेबांना जातिभेद व अस्पृश्यतेचे चटके लहानपणापासून सहन करावे लागले. अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यावरही बडोद्यासारख्या संस्थानात त्यांना रहायला घर मिळाले नाही की सन्मानाची वागणूक मिळाली नाही. जातिभेदांच्या उतरंडीवर आधारित विषमतायुक्तसमाजव्यवस्था ही त्याला कारणीभूत असल्याची जाणीव त्यांना सतत होती.
बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात 1916मध्ये ‘जातींची उत्पत्ती, जडणघडण आणि विकास’ या विषयावर लिहिलेल्या निबंधापासून ते 1956मध्ये बुद्ध धम्माचा स्वीकार करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी समतेसाठी उभारलेल्या लढ्याचे अंतःसूत्र आपल्याला दिसते. ही लढाई अस्पृश्यतेच्या निवारणाची, मूलभूत मानवी हक्कांची, समतायुक्त समाजाच्या उभारणीची आणि राष्ट्राच्या घडणीची असल्याचे स्पष्ट भान त्यांच्याकडे होते. त्यामुळेचमहाडच्या सत्याग्रहाची ‘धर्मसंगर’ अशी मांडणी करताना या लढाईत आपल्याबरोबर जे येतील, त्या सर्वांना सोबत घेण्याची भूमिका त्यांनी ठेवली.
मुंबई प्रांतिक सभेत रावबहादूर सी. के. बोले यांच्या पुढाकाराने सार्वजनिक शाळा, धर्मशाळा व पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा ठराव 1923मध्येच संमत झाला होता. याला अनुसरून महाडचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांनीही नगरपरिषदेत तसा ठराव केला होता. 1924मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेच्या स्थापनेनंतर बाबासाहेबांनी या प्रश्र्नावर आंदोलन करायचे ठरवले, तेव्हा त्यांनी महाडच्या चवदार तळ्याची सत्याग्रहासाठी निवड केली.त्यासाठी 19 व 20 मार्च 1927 रोजी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे आयोजन करण्यात आले, तेव्हा हजारो अस्पृश्य बांधवांबरोबरच स्वतःटिपणीस, अनंतराव चित्रे, गंगाधर सहस्रबुद्धे, बापूसाहेब जोशी, तुळजाराममीठा,भाईशेठवडके, शांताराम पोतनीस आदी मंडळींचा त्यात हिरीरीने सहभाग होता.
ज्या तळ्यावर गुरेढोरे व अन्य धर्मीयांनाही पाणी पिण्याची मुभा होती, तिथे अस्पृश्यांना मात्र येण्यास बंदी होती. ती झुगारून बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो अनुयायी चवदार तळ्याच्या काठी आले आणि त्याचे पाणी पिऊन आपला माणूसपणाचा मूलभूत हक्क प्रस्थापित केला. यामुळे संतप्त झालेल्या सनातन्यांनीवीरेश्वर मंदिरात हे लोक आता घुसतील, अशी आवई उठवून परतणाऱ्यासत्याग्रहींवर हल्ला चढवला. अनेकांची डोकी फुटली. मंडपातील जेवणातही माती कालवण्यात आली. मात्र, बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना शांत राहण्यास बजावल्यानेच पुढचा दुर्धर प्रसंग टळला.
बाबासाहेबांनी‘बहिष्कृत भारता’तील लेखांमध्ये आणि या काळातील भाषणांमध्ये आपली भूमिका रोखठोकपणे मांडली आहे. या लेखाच्या मर्यादेत त्याचा व्यापक वेध घेणे शक्य नाही. परंतु, ही चळवळ केवळ अस्पृश्यांच्याआत्मोद्धाराची नसून, मानवधर्मउद्धाराची असल्याचे त्यांनी ठासून सांगितले आहे. आपले हे कार्य लोकसंग्रहाचे आहे, असे सांगून बाबासाहेब लिहितात, ‘अस्पृश्यतेमुळे केवळ अस्पृश्यांचेच नुकसान झाले नसून, स्पृश्यांचे व देशाचेही अपरिमित नुकसान झाले आहे. …त्यांना आत्मसामर्थ्य प्राप्त झाले, तर ते आपली उन्नती करतील व आपल्या पराक्रमाने, बुद्धीने, उद्योगाने देशाच्या भरभराटीस कारणीभूत होतील’.
पुढे डिसेंबर 1927मध्ये महाडमध्ये झालेल्या परिषदेत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्यासंबंधीचा ठराव गंगाधर सहस्रबुद्धे यांनी मांडला आणि त्यांच्याच हस्ते ही होळी करण्यात आली. मात्र, याच परिषदेत स्वतःबाबासाहेबांनी‘हिंदूमात्राचाजन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा’ मांडला, हे अनेकांना माहिती असत नाही. ‘सर्व माणसे जन्मतः समान दर्जाचीच आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच आहेत’, यासारखी या जाहीरनाम्यातीलकाही तत्त्वे पुढे भारतीय राज्यघटनेच्या रुपाने या देशाला पुढे नेणारी ठरली, याची नोंद घेणे त्यामुळेच आवश्यक ठरते.
या प्रसंगीच्या एका भाषणात बाबासाहेब म्हणतात, ‘…यास्तव हिंदू समाज समर्थ करावयाचा असेल, तर चातुर्वर्ण्य व असमानता यांचे उच्चाटन करून हिंदू समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन तत्त्वांच्या आधारे केली पाहिजे. अस्पृश्यतानिवारणाचा मार्ग हा हिंदू समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणून मी म्हणतो की, आपले कार्य जितके स्वहिताचे आहे, तितकेच राष्ट्रहिताचेही आहे’.
महाडचा धर्मसंगर आणि इतरही अनेक निमित्तांनीबाबासाहेबांनी भारतीय समाज आणि हिंदू धर्माची कठोर चिकित्सा केली आहे. त्यामागे या देशातील सामाजिक ऐक्य दृढ व्हावे, हीच भावना आपल्याला सातत्याने दिसते. तत्कालीन समाजाला त्याचे भान अनेकदा असत नाही. चवदार तळ्यावर सत्याग्रह करून परतणाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यामहाडमधील तत्कालीन लोकांनाहीते नव्हते. पण, कालांतरानेबाबासाहेबांच्या कार्याची व्यापकता व महत्त्व लक्षात आल्यानंतर याच महाडनगरपरिषदेने 1940 आणि 1942मध्ये मानपत्र देऊन त्यांचादोनदा सत्कार केला, याची नोंदही आवर्जून घेतली पाहिजे.
डॉ. संजय विष्णू तांबट
सौजन्य -विश्व संवाद केंद्र ,पुणे