सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचार करताना कोणतीही कसूर सोडत नाहीयेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘शक्ती’ वरून टीका केली होती. राहुल गांधी यांच्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेत्यांना आमची परंपरा माहिती नाही तसेच त्या परंपरेचा ते सन्मान देखील करत नसल्याची टीका अमित शहा यांनी राहुल गांधींवर केली आहे. देशातील महिला खंबीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभ्या आहेत असे न्यूज १८ रायझींग भारत समिट २०२४ मध्ये बोलताना अमित शहा म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ”त्यांना माहिती नाही की ते काय करत आहेत. या देशातील महिला शक्ती पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.राहुल गांधींना निवडणुकीत त्यांची खरी ताकद दाखवण्याचा निर्धार देशातील महिला शक्तीने केला आहे. राहुल गांधींना आमच्या परंपरा माहीत नाहीत आणि ते त्यांचा आदरही करत नाहीत. ईच्या आशीर्वादापेक्षा मोठा आशीर्वाद असू शकत नाही आणि बहिणीच्या आपुलकीपेक्षा मोठा आपुलकी असू शकत नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, ”या देशाचे दोन भागात विभाजन व्हावे ही काँग्रेसची नीती आहे. मात्र राहुल गांधींना चिंता करण्याची गरज नाहीये. आता भाजपा इतकी ताकदवान आहे की, काँग्रेस दुसऱ्यांदा देशाचे विभाजन करू शकणार नाही. देशाचे तुकडे होऊन देऊ नका.” पुढे, इलेक्टोरल बाँड्सवर बोलताना, केंद्रीय गृहमंत्र्यांनी निदर्शनास आणले की भाजपला ६,२०० कोटी रुपये मिळाले आहेत, तर भारतीय आघाडीला ६,२०० कोटींहून अधिक मिळाले आहेत.