देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच आचारसंहिता लागू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बदली झाली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असणारे भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. आता भूषण गगराणी हे मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. तर ठाणे महापालिकेचे आयुक्तपद हे सौरभ राव आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपद हे कैलास शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे.
ज्या अधिकाऱ्यांची एखादी नियुक्ती एका ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक वर्षे असेल अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. निवडणूक आयोगाचे याबाबतीत स्पष्ट आदेश असताना देखील महाराष्ट्र सरकारने या बदल्या केल्या नव्हत्या. देशभरात देखील अशीच स्थिती असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी आयोगाने बदल्यांच्या मुद्द्यांवर विविध राज्य सरकारांना दणका दिला होता. राज्यात मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल सिंह यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटविले होते. महाराष्ट्र सरकारने इकबाल चहल सिंह, अश्विनी भिडे आणि पी. वेलरासू यांची बदली करू नये अशी विनंती केली होती. मात्र ती मागणी फेटाळत आयोगाने या बदल्या केल्या आहेत.
इकबाल चहल सिंह यांच्या बदलीनंतर भूषण गगराणी हे आयुक्तपदासाठी दावेदार मानले जात होते. अखेर त्यांची नियुक्ती आयुक्तपदावर करण्यात आली आहे. भूषण गगराणी हे १९९० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार होता.