ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) यांची ब्रेन सर्जरी (Brain Surgery) करण्यात आली आहे. सद्गुरू जग्गी वासुदेव यांना दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये (Apollo Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर ब्रेन सर्जरी पार पडली. याबाबतची माहिती सद्गुरू यांनी स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे.
मागील काही आठवड्यांपासून सद्गुरू जग्गी वासु्देव यांना डोकेदुखीचा खुप जास्त त्रास होत होता. हा त्रास त्यांना सतावत असतानाही ते त्यांचे दैनंदिन कार्यक्रम आणि सामाजिक कार्य करत होते. मात्र, 18 मार्च रोजी सद्गुरू यांना जास्त त्रास व्हायला लागला आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना त्याच दिवशी दुपारी दिल्लीतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले.
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी रूग्णालयात दाखल होण्याआधी न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्याशी संपर्क साधत फोनवर सल्ला घेतला. तसेच सद्गुरूंना सब ड्यूरल हेमेटोमा असल्याचा संशय सुरींना वाटला. त्यामुळे त्यांनी ताबडतोब एमआरआय करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याच दिवशी 4.30 च्या सुमारास सद्गुरू यांच्या मेंदूचा एमआरआय करण्यात आला. तर एमआरआय रिपोर्टमध्ये सद्गुरूंच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले.
सद्गुरू यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान डॉक्टरांच्या लक्षात आले की, 3-4 आठवड्यांपासून त्यांच्या डोक्यात रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर डॉ.विनीत सुरी, डॉ. सुधीर त्यागी, डॉ. एस चॅटर्जी आणि डॉ. प्रणव कुमार या डॉक्टरांच्या टीमने सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी केली. त्यानंतर सद्गुरू यांचे व्हेंटिलेटर हटवण्यात आले. तसेच सध्या सद्गुरू यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, ब्रेन सर्जरी झाल्यानंतर सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी आपली प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे.