आज सकाळीच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. सकाळी ६ ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले आहेत. बीड जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. अचानक धरणीकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच भूकंपाचे धक्के बसताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.
नांदेड, हिंगोली, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ही ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा शिंदे या गावामध्ये असल्याचे समोर आले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात देखील सकाळच्या वेळेस भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. नांदेड तालुक्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपासून भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी पुन्हा एकदा नागरिकांना भूकंपाच्या धक्क्यांचा सामना करावा लागला. सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान हिंगोली, नांदेड, परभणी आणि बीड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.