आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या २२ मार्चपासून सुरु होत आहे. यंदा अनेक बदल आपल्याला आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांमध्ये पाहायला मिळणार आहेत. उद्यापासून आयपीएलचा महासंग्राम सुरु होणार आहे. पहिल्या आयपीएल सामन्यासाठी चेपॉक स्टेडियम सज्ज झाले आहे. पहिला आयपीएलचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. सध्या सोशल मीडियावर चेपॉक स्टेडियमवरील काही फोटो व्हायरल होत आहेत. उद्या संध्याकाळी सामन्याच्या आधी आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होणार आहे.
प्रसिद्ध गायक ए. आर रेहमान, सोनू निगम हे २०२४ च्या आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये आपली कला सादर करणार आहेत. २२ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ देखील परफॉर्मन्स सादर करणार आहेत. ओपनिंग सेरेमनी ६.३० वाजता सुरु होणार आहे. तर चेन्नई व बंगलोर हा पहिला सामना चेपॉक स्टेडियमवर ७.३० वाजता सुरु होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात ब्लॉकबस्टर सामन्याने होणार आहे.
आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बंगलोर या दोन संघामध्ये होत होणार आहे. त्यामुळे एमएस धोनी आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत. पहिला सामना कोण जिंकणार आणि या स्पर्धेची सुरुवात कोण गोड करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या ७ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे उर्वरित वेळापत्रक जाहीर झालेले नाही. २४ मार्च रोजी पाच वेळा विजतेपद पटकावलेले मुंबई इंडियन्स विरुद्ध आणि गेल्यावर्षीचे उपविजेता गुजरात टायटन्स हे समोरासमोर येणार आहेत. हा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे.