क्रिकेट विश्वार शोककळा पसरली आहे. पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सईद अहमद (Saeed Ahmed) यांचे निधन झाले आहे. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. तर आज (21 मार्च) त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Saeed Ahmed Passed Away)
सईद अहमद यांच्या निधनाने पाकिस्तान क्रिकट विश्वावर शोककळा पसरली आहे. पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सईद अहमद यांच्या निधनावर शोक व्यक्त करत एक निवेदन जारी केले आहे. आमचे माजी कसोटी कर्णधार सईद अहमद यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पीसीबी दु:खी आहे. तसेच मी त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो. सईद अहमद यांनी मनापासून पाकिस्तानची सेवा केली आणि त्यांनी कसोटी संघासाठी केलेल्या कामाचा पीसीबी आदर करतो, असे मोहसीन नक्वी यांनी म्हटले आहे.
सईद अहमद यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, ते 1958 ते 1973 पर्यंत पाकिस्तानसाठी 41 कसोटी सामने खेळले होते. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 2991 धावा केल्या होत्या, ज्यात 5 शतकांचा समावेश आहे. तर सईद यांनी 1969 मध्ये इंग्लंडविरूद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व देखील केले होते.
सईद अहमद यांनी फलंदाजीसोबत गोलंदाजीमध्येही महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ऑफस्पिनर म्हणून 22 विकेट्स घेतल्या होत्या.विशेष सांगायचे झाले तर सईद यांनी वयाच्या 20 वर्षी वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी पदार्पण केले होते.