लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. याच्या तारखा देखील जाहीर झाल्या असून, आचारसंहिता देखील लागू झाली आहे. दरम्यान एनडीए आणि इंडी आघाडीने जागावाटपासंदर्भातील चर्चा सुरु केली आहे. तर राज्यात देखील महायुती आणि मविआ यांच्यातील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मविआमध्ये अजूनही जागावाटपावरून अजूनही मतभेद आहेत. बारामती, मावळ अशा अनेक जागांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाचे मतभेद झालेले दिसून येत आहेत. त्यात आता सांगलीची जागाही अधिक चर्चेत आली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढविण्यास ठाकरे गट आणि काँग्रेस देखील उत्सुक आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसने बहिषकर टाकला आहे. उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. मिरजेत ते आज बोलणार आहे. ते यावेळी उमेदवाराची घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. असे असतानाच काँग्रेसने जनसंवाद मेळाव्यावर बहिषकर टाकला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मविआमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आमंत्रण स्वीकारले आहे.
सांगलीच्या जागेचा तिढा काय
सांगली मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. या जागेवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा आमच्याकडे असेल असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर सांगली जागा काँग्रेसकडे राहावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळे या जागेचा तिढा कधी सुटणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.