स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ते ‘इंडिया आघाडी’सोबत (INDIA Alliance) का गेले नाहीत याबाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच मी स्वाभिमानीच्या माध्यमातून स्वतंत्र निडवणूक लढवणार आहे, असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आहे. ते गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी रात्री आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, मी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या साथीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या आणि दिल्लीला पाठवा. जर सरकारने साखरेची निर्यात बंदी उठवली तर मी उसाला 5 हजार रूपये दर मिळवून देईन, अशी ग्वाही शेट्टींनी दिली.
लोकसभेची निवडणूक मी स्वतंत्र लढणार असून ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी द्यावा. कारण ‘इंडिया आघाडी’मध्ये या म्हणणारे भाजपसोबत गेले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यादव आणि खासदार अशोक चव्हाण भाजपसोबत गेले, त्यामुळे आता कोणावर भरवसा राहिलेला नाही. तसेच यावरून आम्ही कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न होता. म्हणूनच मी इंडिया आघाडीत गेलो नाही. मी स्वाभिमानीच्या माध्यमातून स्वतंत्र निडवणूक लढवणार आहे, असे राजू शेट्टींनी स्पष्ट केलं.
दरम्यान, गणेशवाडीमध्ये गणपती मंदिर परिसरात राजू शेट्टींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजू शेट्टींचे आगमन होताच जेसीबीतून फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.