कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते डीव्ही सदानंद गौडा (DV Sadananda Gowda) यांना बेंगळुरू उत्तरमधून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट न मिळाल्याने ते नाराज आहेत. या दरम्यान, डीव्ही सदानंद गौडा यांनी मंगळवारी स्पष्ट केले की भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि ते योग्य वेळी निर्णय घेतील.
माजी मुख्यमंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी आज (21 मार्च) पत्रकार परिषदेत सांगितले की, “माझ्या जागी दुसऱ्याला तिकीट देण्यात आले आहे, त्यामुळे मी भाजपवर नाराज आहे. तसेच मला काँग्रेस पक्षात येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, मात्र मी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी माझी इच्छा आहे.”
“काँग्रेसच्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आहे आणि भाजपच्याही लोकांनी मला विचारले आहे, त्यामुळे याबाबत मी योग्य वेळी निर्णय घेईन”, असेही सदानंद गौडा म्हणाले.
सदानंद गौडा यांनी सोमवारी सांगितले होते की, ते लवकरच त्यांच्या “भावना” सांगतील. तसेच पुन्हा उमेदवारी न मिळाल्याबद्दल आणि पक्षाच्या काही नेत्यांविरोधात नाव न घेता नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की, ‘कर्नाटकमध्ये भाजप हा वेगळ्या प्रकारचा पक्ष आहे, असे म्हणण्यासारखं काही उरलेलं नाही.’
गौडा यांनी यापूर्वी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु नंतर पुन्हा निवडणूक लढवण्याचा दबाव असल्याचे सांगत त्यांनी माघार घेतली. दरम्यान, राज्यातील प्रमुख समुदायांपैकी एक असलेल्या वोक्कलिगा समुदायाचे असलेले गौडा यांनी मंगळवारी ‘स्टेट वोक्कलिगा असोसिएशन’च्या नेत्यांची भेट घेतली.
बैठकीनंतर सदानंद गौडा म्हणाले, “राज्य वोक्कलिगारा असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला भेटण्यासाठी वेळ मागितला होता, त्यांना माझ्याशी बोलायचे होते, पण मी त्यांना स्वतः भेटायला येईन असे सांगितले. त्यांनी माझ्याशी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. याबाबत मी आत्ताच काही उघड करू इच्छित नाही. मी उद्या पत्रकार परिषद बोलावली आहे, मी तिथे सर्व काही सांगेन.”