पहिली बातमी आहे ती म्हणजे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी मनसे महायुतीमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरु होत्या. तसेच राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. अमित शहा यांची राज ठाकरेंनी भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते. सध्या मनसे महायुतीमध्ये सामील होण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. कारण मुंबईच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे राज ठाकरे यांच्या अत्यंत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत मनसे महायुतीमध्ये सामील होण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
आज सकाळीच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. सकाळी ६ ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले आहेत. बीड जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. अचानक धरणीकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच भूकंपाचे धक्के बसताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. नांदेड, हिंगोली, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ही ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
आयपीएलचा १७ वा हंगाम येत्या २२ मार्चपासून सुरु होत आहे. यंदा अनेक बदल आपल्याला आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांमध्ये पाहायला मिळणार आहेत. उद्यापासून आयपीएलचा महासंग्राम सुरु होणार आहे. पहिल्या आयपीएल सामन्यासाठी चेपॉक स्टेडियम सज्ज झाले आहे. पहिला आयपीएलचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. सध्या सोशल मीडियावर चेपॉक स्टेडियमवरील काही फोटो व्हायरल होत आहेत. उद्या संध्याकाळी सामन्याच्या आधी आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. याच्या तारखा देखील जाहीर झाल्या असून, आचारसंहिता देखील लागू झाली आहे. दरम्यान एनडीए आणि इंडी आघाडीने जागावाटपासंदर्भातील चर्चा सुरु केली आहे. तर राज्यात देखील महायुती आणि मविआ यांच्यातील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मविआमध्ये अजूनही जागावाटपावरून अजूनही मतभेद आहेत. बारामती, मावळ अशा अनेक जागांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाचे मतभेद झालेले दिसून येत आहेत. त्यात आता सांगलीची जागाही अधिक चर्चेत आली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढविण्यास ठाकरे गट आणि काँग्रेस देखील उत्सुक आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसने बहिषकर टाकला आहे. उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. मिरजेत ते आज बोलणार आहे. ते यावेळी उमेदवाराची घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. असे असतानाच काँग्रेसने जनसंवाद मेळाव्यावर बहिष्कार टाकला आहे.