सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत तसेच आचारसंहिता लागू झाली आहे. आता सत्ताधारी आणि विरोधक प्रचार करताना एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाला लोकं पूर्णपणे नाकारतील आणि त्यांनी आपला प्रभाव दिसून लागल्यानेच पत्रकार परिषद घेतली अशी टीका नड्डा यांनी काँग्रेसवर केली आहे.
जेपी नड्डा यांनी एक्स वर पोस्ट केले. त्यात ते म्हणाले, ”काँग्रेसला जनता पूर्णपणे नाकारणार आहे. आपला प्रभाव दसून लागल्यानेच त्यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. तसेच त्यात भारतीय लोकतंत्र आणि संस्थांविरुद्ध विधाने केली. ते सहजपणे त्यांच्यावर आरोप करीत आहेत. स्वतःच्या चुका सुधारण्याऐवजी काँग्रेस अधिकाऱ्यांना दोष देत आहे. आयटीएटी असो की दिल्ली हायकोर्ट, त्यांनी काँग्रेसला नियमांचे पालन करण्यास, थकीत कर भरण्यास सांगितले आहे परंतु पक्षाने तसे केले नाही.”
तसेच आपल्या पोस्टमध्ये नड्डा पुढे म्हणाले, ”ज्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रातून, राज्यातून प्रत्येक क्षणी लूट केली आहे. त्यांच्यासाठी आर्थिक असहायतेबद्दल बोलणे हास्यास्पद आहे. काँग्रेस जीपपासून ते हेलिकॉप्टर घोटाळ्यापर्यंतच्या सर्व घोटाळ्यांमधून जमा झालेला पैसा त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी वापरू शकते.काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना नड्डा म्हणाले, “काँग्रेसचे अर्धवेळ नेते म्हणतात की भारत लोकशाही देश आहे हे खोटे आहे. मी त्यांना नम्रपणे आठवण करून देऊ शकतो की भारत १९७५ ते १९७७ या काही महिन्यांसाठी लोकशाही देश नव्हता आणि त्या वेळी भारताच्या पंतप्रधान इतर कोणी नसून श्रीमती इंदिरा गांधी होत्या.”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केंद्रावर टीकास्त्र सोडले आणि आज भारतात “लोकशाही नाही” असे प्रतिपादन केले आणि भारत ही लोकशाही आहे ही कल्पना खोटी असल्याचा आरोप त्यांनी केला.