उद्यापासून (22 मार्च) आयपीएल 2024 ला (IPL 2024) सुरूवात होत आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. त्यामुळे उद्याच्या या रोमांचक सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच मॅचच्या एक दिवस आधीच महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील सीएसके संघाला मोठा धक्का बसला आहे.
सीएसकेचा उद्याचा पहिला सामना श्रीलंकेचा स्टार गोलंदाज मथिशा पाथिराना (Matheesha Pathirana) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. मथिशा पाथिरानाला बांगलादेशाविरूद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे तो आपला स्पेलही पूर्ण करू शकला नव्हता. तर आता तो उद्याचा सामनाही खेळू शकणार नाहीये त्यामुळे धोनीच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, मथिशा पाथिराना एसएलसीकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरच सीएसके संघात सामील होऊ शकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्याच्या सामन्यातून मथिशा पाथिराना दुखापतीमुळे बाहेर गेला असतानाच दुसरीकडे न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे देखील बाहेर गेला आहे. कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे त्यामुळे तो मे महिन्यापर्यंत मैदानाबाहेर राहणार आहे. तर दोन्ही स्टार गोलंदाज बाहेर असल्यामुळे सीएसके संघाला मोठा धक्का बसला आहे.