दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीसाठी अनेक समन्स पाठवले आहेत. मात्र एकही समन्सला अरविंद केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सविरुद्ध दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी तुम्ही तपास यंत्रणांसमोर का उपस्थित होत नाही असा सवाल कोर्टाने त्यांना विचारला. यावर आम्हाला संरक्षण हवे असल्याचे केजरीवालांच्या वकिलांनी सांगितले. दरम्यान दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
दिल्ली हायकोर्टाने आजच्या सुनावणीत सांगितले की, आम्ही अरविंद केजरीवालांना अटकेपासून कोणतेही संरक्षण देऊ शकत नाही. दरम्यान आम्ही ईडीसमोर हजर होण्यास तयार आहे मात्र आम्हाला अटक होणार नाही याची खात्री द्यावी अशी विनंती केजरीवालांनी कोर्टाला केली होती. अरविंद केजरीवालांनी ईडीच्या ९ व्या समन्सविरुद्ध दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने आतापर्यंत तब्बल १० समन्स बजावले आहेत. या सॅम्सनमधून चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीआधी मला अटक करण्याचे षडयंत्र आहे असा आरोप देखील केजरीवालांनी केला होता. तसेच अरविंद केजरीवालांनी ईडीच्या समन्सला हायकोर्टात आव्हान दिले होते. ईडीचे सॅमसन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असा आरोप केजरीवालांनी केला आहे.