उद्यापासून आयपीएल (IPL 2024) सुरू होत आहे. तसेच उद्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. त्यामुळे उद्याच्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता आयपीएलमधून मोठी बातमी समोर आली आहे. एमएस धोनीने (MS Dhoni) अचानक कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
एमएस धोनीने सीएसके संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून आता मराठमोळा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चेन्नईचा नवा कर्णधार बनला आहे. याबाबतची अधिकृत माहिती आयपीएलने सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.
गेल्या मोसमात धोनीने सीएसके संघाला पाचव्यांदा आयपीएल जिंकून दिले होते. तर आता धोनीने संघाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. तसेत आज आयपीएलने सर्व कर्णधार आणि ट्रॉफीचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तर या फोटोसेशनला सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी ऐवजी ऋतुराज गायकवाडने उपस्थिती लावली होती.
दरम्यान, धोनीने सीएसके संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आयपीएल 2022 मध्ये संघ व्यवस्थापनाकडून कर्णधारपदात बदल करण्यात आले होते. त्यावेळी धोनीच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, जडेजा नीट जबाबदारी पार पाडू शकला नाही त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडत कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा संघाची कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.