सध्या सर्व राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकिकडे निवडणुकीती तयारी सुरू असताना दुसरीकडे नेत्यांचे पक्षप्रेवश होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) जोरदार धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन कोडवते (Nitin Kodwate) यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर नितीन कोडवते हे पक्षाला रामराम करणार असून ते आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. ते आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यामुळे पुन्हा काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
नितीन कोडवते हे आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर काल काँग्रेसने लोकसभेसाठी महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात गडचिरोली-चिमूर मतदार संघात उमेदवारी मिळण्यासाठी नितीन कोडवते स्पर्धेत होते. पण काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे नितीन कोडवतेंना उमेदवारी दिली नसल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
नितीन कोडवते यांच्याकडे काँग्रेस प्रदेश सचिवची जबाबदारी होती. पण आता त्यांना लोकसभेसाठी तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं जातंय.