कॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरणात टीएमसीच्या माजी खासदार महुआ मोईत्रा (Mahuaa Moitra) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाई करत सीबीआयने (CBI) गुरुवारी (21 मार्च) मोईत्रा यांच्या विरोधात एफआयआर (FIR) नोंदवला आहे.
सीबीआयने चौकशीसाठी रोख रकमेप्रकरणी महुआ मोईत्राविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. लोकपालच्या निर्देशानुसार केंद्रीय एजन्सीने ही कारवाई केली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
या प्रकरणातील सीबीआयने प्राथमिक तपास केल्यानंतर लोकपालने एजन्सीला सूचना दिल्या. त्याअंतर्गत मोईत्राविरुद्धच्या तक्रारींची सर्व बाजू तपासल्यानंतर सहा महिन्यांत निष्कर्ष सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात महुआ मोईत्रा यांना समन्स जारी केले होते. तसेच न्यायालयाने मोइत्रा यांना उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी न्यायालयाने अनेक माध्यम संस्थांना समन्सही बजावले आहेत.
गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये, सभापतींनी महुआ मोइत्रा यांच्यावर अनैतिक वर्तनासाठी कारवाई केली होती. त्यांची सभागृहातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तर टीएमसीने मोईत्रा यांना लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार केले आहे.