काल (21 मार्च) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच त्यांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सध्या आपच्या कार्यकर्त्यांकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. तर आता अरविंद केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंनी (Anna Hazare) प्रतिक्रिया दिली आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, मद्यधोरणावर मी अनेकवेळा पत्र लिहिले आहे. कारण आज दारूमुळे महिलांवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. याला आळा बसला पाहिजे, हाच माझा पत्र लिहिण्याचा उद्देश होता. दारूमुळे खूनही होतात. त्यामुळे दारूची ही नीती संपवली पाहिजे.
दारूची नीती संपवली पाहिजे, हे अरविंदच्या डोक्यात बसले नाही. शेवटी त्याने मद्यविक्रि धोरण जारी केले. शेवटी त्याला त्याच मद्यनीतीमुळे अटक झाली. त्यामुळे आता तो आणि सरकार बघून घेईन. तसेच ज्यांची चूक झाली आहे त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे, असेही अण्णा हजारे म्हणाले.
दरम्यान, केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात अटकेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर ईडीने लगेचच सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी होणार नाहीये. कारण अरविंद केजरीवाल यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. आता अरविंद केजरीवाल हे हायकोर्टात आपली याचिका दाखल करणार आहेत. त्यानंतर दिलासा न मिळाल्यास ते सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.