दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. काल रात्री त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज त्यांना विशेष कोर्टात हजर करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात आता केजरीवाल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ईडी आता केजरीवाल यांच्याविरुद्ध हेरगिरीचा गुन्हा देखील दाखल करण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांना केजरीवालांच्या घरी १५० पानांचे दस्तऐवज सापडले असल्याचे समजते आहे. या दस्तऐवजात ईडीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा १५० पानांचा तपशीलवार अहवाल आहे. हे दोन्ही अधिकारी सहसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या रिमांड नोटमध्येही या दस्तऐवजाचा उल्लेख करण्यात आला असून, ही कागदपत्रे सापडल्यानंतर ईडी आपल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हेरगिरी केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करायचा की नाही यावरही विचार करत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काल ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दरम्यान केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात अटकेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर ईडीने लगेचच सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी होणार नाहीये. कारण अरविंद केजरीवाल यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. आता अरविंद केजरीवाल हे हायकोर्टात आपली याचिका दाखल करणार आहेत. त्यानंतर दिलासा न मिळाल्यास ते सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.