जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे तब्बल चार वर्षानंतर विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. तसेच पोलिंग एजंट निवडण्यात वेळ लागल्याने एक तासाहून अधिक विलंबाने मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात होणार होती.
मतदान सुरू होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच विद्यार्थी मतदान केंद्रांभोवती जोरदार घोषणाबाजी करत जमले होते. यावेळी ABVP समर्थकांनी ‘जय श्री’च्या घोषणा दिल्या तर डाव्या गटांनी ढोल-ताशा वाजवून ‘लाल सलाम’ गायले.
आज (22 मार्च) होणाऱ्या या निवडणुकीत मतदान करण्यासाठी एकूण 7,751 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाने या निवडणुकीवरील याचिकेवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची आगामी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. तसेच जेएनयूच्या एका विद्यार्थ्याने दाखल केलेल्या याचिकेत लिंगडोह आयोगाच्या शिफारशींचा समावेश करून जेएनयूएसयू निवडणुका घेण्यासाठी विद्यापीठाचे योग्य नियम किंवा यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मागितले आहेत.
विद्यार्थी संघटनेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहसचिव अशी चार केंद्रीय पॅनेल पदे आहेत. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी आठ उमेदवार (1 महिला, 7 पुरुष) अंतिम करण्यात आले असून, उपाध्यक्षपदासाठी 4 उमेदवार (1 महिला, 3 पुरुष) निवडणूक लढवत आहेत.
या निवडणुकीसाठी अभाविपने उमेशचंद्र अजमिरा यांना अध्यक्षपदासाठी तर दीपिका शर्मा यांना उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. तर अर्जुन आनंद आणि गोविंद डांगी यांना अनुक्रमे सरचिटणीस आणि सहसचिवपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
AISA, SFI, DSF आणि AISF पॅनलच्या युनायटेड लेफ्ट प्रतिनिधींनी धनंजय यांना अध्यक्षपदाचे उमेदवार, अविजित घोष उपाध्यक्ष म्हणून, स्वाती सिंग सरचिटणीस आणि साजिद यांना सहसचिव म्हणून उभे केले आहे.
दरम्यान, JNUSU च्या निवडणुका तब्बल चार वर्षांनी होत आहेत. कोविड-19 महामारीमुळे या निवडणुका रखडल्या होत्या आणि त्यानंतर त्या होऊ शकल्या नाहीत. तर शेवटची JNUSU निवडणूक 2019 मध्ये डाव्या बाजूच्या SFI उमेदवार ऐशी घोष यांनी जिंकली होती. तसेच AISA, SFI, DSF आणि AISF च्या युतीचा समावेश असलेल्या युनायटेड-लेफ्ट अलायन्स या बॅनरखाली 2019 च्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थ्यांच्या संघटनांनी युती केली होती.