दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने काल रात्री अटक केली आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख देखील आहेत. दिल्ली हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. केजरीवालांच्या अटकेनंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. केजरीवालांच्या अटकेनंतर त्यांच्या कार्यकर्ते देशभर आंदोलन करत आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. केजरीवालांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांना १५० पानांचा रिपोर्ट सापडल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडी कदाचित केजरीवालांवर हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ मधील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आम आदमी पार्टी (आप) नेते आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी कॅबिनेट मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन्ही मंत्र्यांना बसमध्ये बसवले. पक्षाचे अनेक नेते आणि समर्थक आयटीओ येथील आप आणि भाजपच्या कार्यालयाजवळ निदर्शने करत आहेत. परिसरात कलम १४४ लागू झाल्याचा दाखला देत पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. आप समर्थकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सौरभ भारद्वाज म्हणाले, “आम्ही सुप्रीम कोर्टासमोर म्हणू की अरविंद केजरीवाल यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी आणि त्यांना त्यांचे अधिकृत कामही करू द्यावे. केजरीवाल यांच्या कुटुंबाला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.” ईडीच्या अधिकाऱ्यांना केजरीवालांच्या घरी १५० पानांचे दस्तऐवज सापडले असल्याचे समजते आहे. या दस्तऐवजात ईडीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा १५० पानांचा तपशीलवार अहवाल आहे. हे दोन्ही अधिकारी सहसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत.अरविंद केजरीवाल यांच्या रिमांड नोटमध्येही या दस्तऐवजाचा उल्लेख करण्यात आला असून, ही कागदपत्रे सापडल्यानंतर ईडी आपल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हेरगिरी केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करायचा की नाही यावरही विचार करत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.