अभिनेता गोविंदा (Govinda) हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने नव्वदच्या दशकात सुपरहिट चित्रपट देत सिनसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोविंदाचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. त्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो. पण आता तो एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. गोविंदा आता कोणत्याही चित्रपटात दिसणार नाही तर तो आता राजकारणाच्या रिंगणात उतरताना दिसणार आहे.
लवकरच गोविंदा राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तो लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) रिंगणात उतरणार असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच गोविंदा शिवसेनेकडून मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकर गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. काही दिवसांपूर्वीच गोविंदाने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबईसाठी गोविंदाचे नाव चर्चेत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून उत्तर पश्चिम मतदार संघातून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे आता गजानन किर्तीकरांसारख्या अनुभवी उमेदवाराला टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार असणे गरजेचे आहे, या अनुशंगानं सध्या गोविंदाच्या नावाची चर्चा सुरू आहे.