सर्वोच्च न्यायालयाने भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के. कविता यांना जामीन नाकारण्यात आला आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता हिला दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली असून सुप्रीम कोर्टाने कविताला जामिनासाठी खालच्या कोर्टात जाण्यास सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील न्या. संजीव खन्ना, न्या. एमएम सुंदरेश आणि न्या. बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने के. कविता यांना जामीनासाठी खालच्या न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. राजकीय व्यक्ती असल्याच्या कारणावरून जामिनासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. आमचे धोरण सर्वांसाठी समान असल्याचे महत्त्वपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. कोणत्याही जामिनासाठी प्रथम ट्रायल कोर्टात जावे, यावर न्यायालयाने भर दिला.
यावेळी के. कवितांचे वकील ऍड. सिब्बल म्हणाले की, देशात विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना अटक केली जात आहे. त्यामुळे के. कवितांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा. भविष्यात इतिहास लिहीतांना याची नोदं घेतली जाईल असा युक्तीवादही सिब्बल यांनी यावेळी केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, कृपया न्यायालयाला कुणीही राजकीय व्यासपीठ बनवू नका. के. कविता राजकीय पुढारी आहेत म्हणून कलम 32 अंतर्गत त्यांची याचिका विचारात घ्यावी असा आग्रह करणे योग्य नाही. कोर्टाचे नियम सर्वांसाठी समान आहेत. त्यामुळे नियमानुसार आधी खालच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. तसेच हा नियम सर्वांसाठी समान असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. याशिवाय, के. कवितांनी पीएमएलएच्या तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने ईडीकडून 6 आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.