‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. त्याला नोएडामधील रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विष तस्करी प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. तर आता एल्विशला मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या रविवारी म्हणजेच 17 मार्च रोजी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. यानंतर पोलिसांनी एल्विशला अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रविवारी अटक झाल्यानंतर एल्विशला सोमवारी म्हणजेच 18 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार होते, मात्र त्यावेळी वकिलांनी संप केला आणि त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता याप्रकरणी आज (22 मार्च) सुनावणी झाली असून न्यायालयाने एल्विशला जामीन मंजूर केला आहे.
एनडीपीएस कायद्यांतर्गत गंभीर कलमांचा सामना करत असलेल्या एल्विशला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयातून जामीन मिळाला आहे. 5 दिवसांच्या अटकेनंतर एल्विश यादवला जामीन मिळाला आहे.
सापांच्या विष तस्करी प्रकरणी गेल्या वर्षी नोएडा पोलिसांनी सेक्टर 39 मध्ये एफआयआर नोंदवला होता, त्यानंतर 17 मार्च रोजी एल्विश यादवला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी बँक्वेट हॉलवर छापा टाकून 4 सर्पमित्रांसह 5 जणांना अटक करून 9 साप आणि त्यांचे विष जप्त केले आहे. तर या प्रकरणात एल्विशचे नाव समोर आले होते, त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती. दरम्यान, आता एल्विशला जामीन मिळाला आहे. तसंच एल्विशला जामीन मिळाल्यामुळे सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.