पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे दोन दिवस भूतानच्या (Bhutan) दौऱ्यावर आहेत. आज ते भूतानमध्ये पोहोचल्यानंतर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे (PM Tshering Tobgay) यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले.
भूतानमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे तेथील लोकांनी जोरदार स्वागत केले. मोदींच्या स्वागतासाठी पारो येथील विमानतळापासून राष्ट्रीय राजधानी थिम्पूपर्यंतच्या 45 किलमीटरच्या संपूर्ण अंतरावर लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी लोकांनी मोदींचे अभूतपूर्व स्वागत करत मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या.
थिम्पूला पोहोचल्यावर पीएम मोदींनी भूतानच्या लोकांना अभिवादन केले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांशी संवाद साधला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमधील पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकृत राज्य दौऱ्यासाठी उतरले तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर भूतानच्या सशस्त्र दलाकडून पंतप्रधानांना भव्य गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
भूतान दौऱ्यात पंतप्रधान मोदी भारत-भूतान द्विपक्षीय भागीदारी आणखी पुढे नेण्यासाठी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. तसेच भूतान दौऱ्यात पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान शेरिंग तोबगे यांची भेट घेणार आहेत.