काल संध्याकाळी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अतिशय भीषण दहशतवादी हल्ला झाला असून त्यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला आहे तर दीडशे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी,22 मार्च रोजी संध्याकाळी, काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये गोळीबार आणि स्फोट घडवून आणला आहे .
दरम्यान मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा मोठा हल्ला घडला आहे.
५ सशस्त्र दहशवाद्यांनी क्रोकस सिटी हॉलमध्ये संध्याकाळी ६. ३० च्या सुमारास प्रवेश केला आणि मैफिल सुरू होण्यापूर्वी गोळीबार केला. वृत्तानुसार, हॉलमध्ये गोळीबार केल्यानंतर ग्रेनेड हल्लाही करण्यात आला. बंदिस्त ठिकाण असल्यामुळे अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले, कारण तिथून पळण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. 15 ते 20 मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते. त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, ज्यामध्ये 40 टक्के भाग जळून खाक झाला. हल्ल्याच्या ठिकाणावरील व्हिडिओ फुटेजमध्ये , क्रोकस सिटी हॉल कॉन्सर्ट स्थळाला आग लागली असून धुराचे लोट हवेत उडत आहेत. विस्तीर्ण हॉलमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येऊ लागल्याने लोकांचा जमाव एकत्र ओरडताना आणि बाहेर पडताना दिसून आला.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की पाच हल्लेखोरांपैकी एक पकडला गेला आहे.रशियन आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार , पाच मुलांसह 115 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 60 जणांची प्रकृती गंभीर आहे.तसेच मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मॉस्को सिटी ड्यूमाचे अध्यक्ष ॲलेक्सी शापोश्निकोव्ह यांनी मॉस्को रहिवाशांना पीडितांवर उपचार करण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
अग्निशामक दलाने एव्हाना सुमारे 100 लोकांना इमारतीतून बाहेर काढले,असून रशियन फेडरेशनच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाच्या मुख्य संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, बचावकर्ते अजूनही लोकांना छतावरून बाहेर काढण्याचे काम करत आहेत .