कालपासून म्हणजेच २२ मार्चपासून आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु झाला आहे. काल सलामीचा सामना चेन्नई आणि बंगलोर यांच्या खेळला गेला. या सामन्यांमध्ये चेन्नईने विजय प्राप्त केला आहे. तर बंगलोर संघाला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सामना सुरु होण्याआधी आयपीएलचा उदघाटन सोहळा पार पडला. आजच्या दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना हा दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यामध्ये सुरु आहे. दिल्लीचा कर्णधार हा रिषभ पंत आहे. रिषभ पंत हा जवळजवळ ४५५ दिवसांनी मैदानावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
२०२२ मध्ये डिसेंबर महिन्यात फलदांज रिषभ पंत याचा एक भीषण अपघात झाला होता. मात्र त्या अपघातामधून सावरून आज तो पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. ‘बिलीव्ह: टू डेथ अँड बॅक’ या मालिकेतील अपघाताची आठवण करून देताना तो म्हणाला, ‘कोणत्याही रक्तवाहिनीला इजा झाली असती तर पाय गमावण्याची भीती होती. त्यावेळी मी घाबरलो होतो. माझ्या उजव्या गुडघ्याचे हाड निखळले होते आणि त्यामुळे खूप वेदना होत होत्या. मी विचारले की जवळपास कोणी आहे का जो मला माझा पाय सरळ करण्यास मदत करेल. त्याने मला माझा गुडघा योग्य करण्यासाठी मदत केली. रजत कुमार आणि निशू कुमार या दोन व्यक्तींनी पंतला त्याच्या एसयूव्हीमधून बाहेर काढले. नंतर कारने पेट घेतला. पंत म्हणाला, आयुष्यात पहिल्यांदाच अशी भीती वाटली. अपघाताच्या वेळी मला दुखापत झाल्याची जाणीव होती.
पंतवर डेहराडूनमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला मुंबईला विमानाने नेण्यात आले जेथे बीसीसीआयने त्याच्यावर तज्ञांकडून उपचार केले. उजव्या गुडघ्याच्या तीनही लिगामेंटवर शस्त्रक्रिया करून पंतने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव सुरु केला. आता पंत १५ महिन्यांनंतर मैदानात परतत आहे. पंत म्हणाला की, आता सर्वजण त्याला गाडी चालवण्यास मनाई करत आहेत. तो म्हणाला, आता मला सांगितले जात आहे की ‘यार, अजिबात गाडी चालवू नकोस’. पण माझ्यापेक्षा जास्त कोणी घाबरले नाही. मी अजूनही गाडी चालवीन कारण मला ड्रायव्हिंग आवडते. फक्त अपघात झाला याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या गोष्टी पुन्हा करणार नाही.